10 लाखांची लाच घेताना पालिका आयुक्ताला रंगेहाथ पकडलं, ACB ची कारवाई, कंत्राटदारांनी फोडले फटाके, संतोष खांडेकर कोण आहेत ?

Foto
जालना : कंत्राटदाराने केलेल्या कामांचे बिल काढण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेणारे जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आयुक्तांनी रक्कम स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने पथकातील अधिकाऱ्यांना मिसकॉल दिला आणि त्यानंतर खांडेकराना रंगेहाथ पकडण्यात आले. खांडेकर ट्रॅपमध्ये अडकल्याचे समजताच काही युवकांनी ‘एसीबी’च्या कार्यालयासमोरच फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले.

जालना शहरातील वाल्मीकनगर, गांधीनगरचा भाग डीपी रोड ते रिंगरोड दरम्यान रस्त्याचे काम झाले होते. शिवाय मनपाच्या इमारतीवरील बांधकाम व इतर कामेही सुरू आहेत. या कामांचे बिल काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी मनपाचे आयुक्त खांडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु, खांडेकरांनी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे ‘एसीबी’कडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताच खांडेकरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधीक्षक बी. एस. जाधवर यांनी सांगितले. 

दरम्यान खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेल्याचे समजताच माजी नगरसेवकांसह मनापातील अधिकारी, कर्मचारी, अनेक गुत्तेदारही एसीबीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. खांडेकरांच्या कार्यप्रणालीचे किस्सेही चर्चिले जात होते. आयुक्त संतोष खांडेकर यांनी गुरुवारी सायंकाळी ६:४५ पर्यंत बैठका घेतल्या. त्यानंतर ते घराकडे गेले. त्यावेळी एका कर्मचाऱ्यामार्फत स्वाक्षरीसाठी फायली घराकडे मागविण्यात आल्याची चर्चाही कारवाईस्थळी उपस्थित मनपाचे अधिकारी, कर्मचारी करीत होते.

लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर कोण आहेत ?

संतोष खांडेकर हे मूळचे सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून  सुमारे सहा वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ, अमरावती येथे पोलिस खात्यात सेवा केली. एमपीएससी मार्फत वर्ग दोन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. जालना नगरपालिकेत २०१६ ते २०१९ या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर यांनी काम पाहिले होते. त्यानंतर जून २०२२ मध्ये परत ते जालन्यात रुजू झाले होते. मनपाचे आयुक्त आणि प्रशासक म्हणूनही त्यांच्याकडेच पदभार होता. जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती नंतर 9 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यात आले, यावेळी मनपाचे पहिले आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासकीय पदी नियुक्ती करण्यात आली.